शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (13:36 IST)

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता : राजेश टोपे

राज्यात कोरोनाची सद्यपरिस्थिती बघता 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना म्हटलं की राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
 
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील असेही त्यांनी सांगितले.
 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाउनसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. लॉकडाऊनबाबत बेडची उपलब्धता आणि पॉझिटिव्हीटी रेट या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत.त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
दरम्यान लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.