शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (19:04 IST)

महाराष्ट्र लॉकडाऊन: 15 मे नंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार?

दिपाली जगताप
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये लक्षणीयरीत्या कमी होत आहे. तेव्हा अशा परिस्थितीत 15 मेनंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार की उठवला जाणार? असा मोठा प्रश्न आहे.
 
शिवाय, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही राज्यात पूर्वतयारी सुरू झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकताच राज्यभरातील डॉक्टरांशी यासंदर्भात संवाद साधला.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. जवळपास महिन्याभरापासून महाराष्ट्रात संचारबंदीसह कडक लॉकडाऊन लागू आहे.
 
लॉकडाऊनमुळे कामगार आणि नोकरदार वर्गासह लघू आणि मध्यम उद्योगांनाही मोठा फटका बसतोय. त्यामुळे राज्याच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही सरकारला विचार करावा लागणार आहे.
दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन उठवल्यास काही जिल्ह्यांमध्ये कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्याबाबत सरकारसमोर दुहेरी संकट आहे.
 
सरकारी पातळीवर हालचाली सुरू
राज्यातील लॉकडाऊनची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
लॉकडाऊनबाबतचा निर्णय येत्या 15 तारखेला घेतला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
 
ते म्हणाले, "काही जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. राज्याच्या लॉकडाऊनचा निर्णय येत्या काही दिवसांत घेऊ. तसंच राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी झालेला नसून आजही 50-60 हजार नवीन रुग्नांची नोंद होत आहे."
 
लॉकडाऊनचा निर्णय 15 तारखेनंतरच घेतला जाईल अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "लॉकडाऊन शिथिल करायचे की कायम ठेवायचे याबाबत अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही. राज्यातल्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊनच आम्ही निर्णय घेऊ. 15 तारखेपर्यंत निर्णय जाहीर करू," असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही नुकतीच महाराष्ट्रातील कोरोना आरोग्य परिस्थितीबाबत चर्चा झाली.
 
लॉकडॉऊन हा शेवटचा पर्याय असावा असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
 
जिल्हानिहाय लॉकडाऊन असणार का?
 
15 मेपर्यंत निर्णयाची वाट न पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता लॉकडाऊनचा स्वतंत्र निर्णय घेतला जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने आणि ऑक्सिजन, औषधं, बेड्सचा तुटवडा भासत असल्याने लॉकडॉऊनचे निर्णय घोषित करण्यात आले आहेत.
 
त्यामुळे आगामी काळात राज्यात सरसकट लॉकडाऊन कायम ठेवण्याऐवजी जिल्हानिहाय निर्णय घेण्याचाच विचार केला जाऊ शकतो.
 
अमरावती जिल्ह्यात पुढील सात दिवस कडकडीत बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. किराणा मालाच्या दुकानांसह भाजीपाला, फळ विक्रेत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. केवळ मेडिकल आणि हॉस्पिटल्स सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही 20 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ठिकठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं दिसून येत होतं. यापार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यांतर्गत एसटी वाहतूक सेवाही बंद राहणार आहे.
 
सांगली जिल्ह्यात 5 मेपासून पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पालकमंत्री उदय सामंत यांनी सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व आस्थापने आणि दुकानं बंद राहणार आहेत.
 
सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांमध्येही जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाबंदी सह लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत.
 
'मोदी सरकारने राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा'
देशातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय न घेतल्याने रुग्णसंख्या उच्चांक गाठत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलीय.
 
तसंच कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने आता राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावेत असंही ते म्हणाले.
 
"आता लॉकडाऊन लागू करू नका असं नरेंद्र मोदी राज्यांना सांगतात. पण देशात चार लाख एवढे रुग्ण असताना केंद्र सरकारने हात झटकणे हे योग्य नाही. देशासाठी एक धोरण हवे. त्यामुळे आता राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा. तेव्हाच कोरोना नियंत्रणात राहिल," असं नवाब मलिक म्हणाले.
 
राज्यातील आढावा
राज्यातील नवीन रुग्णवाढीची संख्या घटली आहे. रविवारी (9 मे) दैनंदिन रुग्णसंख्या 50 हजारांखाली नोंदवण्यात आली. मुंबई, ठाण्यातही रुग्णसंख्या लक्षणीय घटली आहे.
रविवारी (9 मे) कोरोनाचे 48,401 रुग्ण आढळले. तर 572 रुग्णांचा मृत्यू झाला. जवळपास तीन लाख कोरोना चाचणी केल्यानंतर शनिवारच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या घटली आहे.
 
एप्रिल महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी 63-65 हजार एवढी होती. त्या तुलनेत रुग्णसंख्या आता सरासरी 50 हजारांच्या घरात आहे.
 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यातील मृत्यूदर 1.49 % एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.4% एवढे आहे.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6 लाख 15 हजार 763 वर गेली आहे.