बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (08:22 IST)

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार

MPSC
मुंबई  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर – राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे.
 
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
 
या पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात आले आहे. तसेच लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील असेही लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor