हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाले. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. काही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकणार नाही. बाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारे आहे. बाळासाहेबांचे अनेक नेत्यांशी ऋणाणुबंध होते. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो, अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच इतर आघाडीचे नेते उपस्थित होते.