शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (21:00 IST)

एसएमबीटीमध्ये ७२ तासांत ५२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित करण्यात आलेल्या हृदयविकार शस्त्रक्रिया आणि उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात उत्तर महाराष्ट्रातील  सर्वाधिक बालकांवर उपचार करण्यात आले. ७२ तासांत तब्बल ५२ बालकांवर मोफत यशस्वी हृदय उपचार झाले. शिरपूर, साक्री व मालेगाव परिसरातील सर्वाधिक बालकांचा यात समावेश होता.
 
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शिरपूरहून धुळे आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल कॉरीडोर साकारण्यात आला. याद्वारे तात्काळ खासगी वाहनातून 62 बालकांसह नातेवाईकांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान, रुग्णांसह नातलगांची सर्व काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आली.
एसएमबीटी हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे व नंदुरबार नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. दर महिन्याला हॉस्पिटलकडून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यादरम्यान, यादरम्यान बालकांसाठी मोफत तर प्रौढांसाठी अल्प दरात तपासण्या केल्या जातात. गेल्या महिन्यात शिरपूरसह परिसरात हृदय तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकाच दिवशी विक्रमी अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी याप्रसंगी करण्यात आली.
 
सकाळपासून सुरु झालेले आरोग्य शिबीर रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या शिबिरातील सर्वात मोठे आणि उत्तम नियोजन असलेले शिबीर असल्याची भावना धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) च्या टीमने व्यक्त केली. तसेच आरबीएसकेच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित शिबिरात अनेक बालकांना मोफत उपचारार्थ दाखलदेखील करून घेण्यात आले.
 
ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये २४८ बालकांच्या पालकांनी नोंदणी केली होती. त्यातील १६३ रुग्णांनी शिबिरात तपासणी करण्यात आली. यातील ६५ बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी स्थानिक उद्योगपती आणि विधानपरिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम हॉस्पिटल) ने सहकार्य केले.
 
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट (हृदय विकार कक्ष) हा स्वतंत्र विभाग रुग्णसेवेसाठी वर्षातील ३६५ दिवसही सुरू असतो. या विभागात गत सात वर्षात ह्रदय विकारांवरील १८ हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी  उपचार करण्यात आले आहेत.
 
एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात शिरपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यादरम्यान,  62 बालक व त्यांच्या नातलगांना मिळून १५६ जणांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. विशेष म्हणजे, यातील ५२ बालकांवर यशस्वी मोफत उपचारदेखील करण्यात आले. ग्रामीण भागातील निरोगी आरोग्यासाठी आयोजित शिबिराद्वारे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना एकाच दिवशी आणण्यात आले होते.