शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (16:04 IST)

तानाजी सावंत कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे?

tanaji sawant
गेल्या दोन दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत चर्चेत आहेत. हाफकिन या संस्थेला ते माणूस म्हणाले असं एका वृत्तपत्रात छापून आलं. तानाजी सावंत यांनी माध्यमांना आव्हान केलं की हाफकिनला मी माणूस म्हणालो याचा पुरावा दाखवा. जर मी तसा म्हणालो असेन तर राजीनामा देईन.पुढे ते म्हणाले, "दरवेळी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. मी जे बोललो त्याचा आपल्या सोयीने अर्थ लावून ते माध्यमांमाध्ये चालवलं गेलं."
"मी काही अंगठाबहाद्दर मंत्री नाही, मी पीएचडी होल्डर आहे," असं त्यांनी सुनावलं.
 
तानाजी सावंत यांनी पुण्यातील ससून हॉस्पिटलला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी भेट दिली. त्यावेळी तिथे तानाजी सावंत हे बोलल्याचा दावा वृत्तपत्राने केला होता.
 
वर्तमानपत्रात हे छापून आल्यानंतर सोशल मीडियावर हा प्रसंग वाऱ्यासारखा व्हायरल झाला. मग तानाजी सावंत यांना माध्यमांनी या प्रसंगाबद्दल विचारलं. तेव्हा ते माध्यमांवर चिडले आणि सावंत यांनी स्वत:च शिक्षण सांगितलं.
 
ते म्हणाले, "माझं शिक्षण तुम्हाला माहिती नाही का? मी मूर्ख आहे का? मी इंजिनिअरिंग केलं आहे. मी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर नंतर पदवी मग पीएचडी केली आहे. मीडिया अशा बातम्या मुद्दाम टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे. हाफकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचे मीडियाने दाखवले पण हे वृत्त खोटं आहे.
 
"हे असं काहीही घडलेलं नाही तर मी बोललो असेल तर दाखवा. हे टाकाऊ सरकार नाही. माध्यमांनी टीका करायची आणि आम्ही ऐकून घ्यायचं असं होणार नाही. आम्ही कामातून याला सडेतोड उत्तर देऊ," असे तानाजी सावंत म्हणाले.
 
या घटनेमुळे तानाजी सावंत हे चांगलेच चर्चेत आले आहेत. यानिमित्ताने कोण आहेत तानाजी सावंत याचा एक आढावा..
 
कोण आहेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांचा जन्म 1 जून 1964 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला. त्यांचं मूळ गाव हे सोलापूर आहे.
 
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी त्यानंतर त्यांनी पी.एच.डी पूर्ण केली आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षं काम केलं.
 
उद्योग क्षेत्रात शिक्षण आणि साखर कारखानदारी या क्षेत्रात त्यांचं काम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी येथे भैरवनाथ खासगी साखर कारखाना उभारत त्यांनी साखर कारखानदारी क्षेत्रात प्रवेश केला. आज भैरवनाथ साखर कारखान्याचे विविध जिल्ह्यात पाच युनिट आहेत.
 
त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात त्यांनी जयवंत प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली. या शिक्षण संस्थांचं जाळं त्यांनी महाराष्ट्रभर पसरवलं.
 
राजकारणाची सुरूवात?
राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून केली. मात्र, तेथे संधीची शक्यता दृष्टिपथात नसल्याने 2015 साली शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अल्प काळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन करीत संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते अशी पदे भूषविली.
 
2016 साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. महायुती सरकारच्या 2019 साली विधानपरिषदेची 3 वर्षं शिल्लक असताना त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा येथून विधानसभा निवडणूक लढवली.
 
या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म आमदार राहिलेले राहुल मोटे यांचा पराभव केला.
फडणवीस - ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंधारण खाते देण्यात आले होते. पहिल्यांदाच विधानसभा आमदार आणि त्यानंतर लगेच तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.
 
पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले. मंत्रिपदाची महत्वाकांक्षा असलेल्या तानाजी सावंत यांनी स्वपक्षावर टीका केली होती.
 
खेकड्याच्या विधानामुळे टीकेचे धनी
फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्यात तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते. यादरम्यान कोकणातील तुफान पावसामुळे जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती.
 
या दुर्घटनेत 19 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तानाजी सावंत यांना खात्याचे प्रमुख म्हणून या दुर्घटनेबाबत विचारले असता त्यांनी हे धरण खेकड्याच्या पोखरण्यामुळे फुटले असल्याचा अजब दावा केला होता.
 
ते म्हणाले होते, " धरण फुटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. काही गोष्टी कोणाच्याही हातात नसतात. काही ग्रामस्थ आणि अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर खेकड्यांच्या पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतय." त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला होता.
 
विरोधकांनी या विधानावरून सावंत यांना धारेवर धरले होते. त्यांच्यावर सोशल मिडीयावरही चौफेर टीका झाली होती. अनेकांनी धरण हे खेकड्यामुळे कसे फुटू शकत नाही यांचे संशोधनही सांगितले होते.
 
माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की केवळ खेकड्यांमुळे धरण फुटले असे मी कधीच म्हटलो नव्हतो. धरण फुटण्यासाठी जे काही फॅक्टर्स असतात त्यापैकी ते देखील एक असण्याची शक्यता होती असं मी म्हटलं होतं. पण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असं ते म्हणाले.
 
तानाजी सावंत माध्यमांना काय म्हणाले?
"मी मूर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे तसंच रँकर आहे. मीडिया मुद्दाम मला टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे," असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
 
पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे.
 
याबद्दल छापून आलेली बातमी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्याने सावंत यांच्यावरती टीका सुरू झाली. या सर्व प्रकरणावर आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
खेकड्यांमुळे धरण खरंच फुटू शकतं का?
"हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचं मीडियानं दाखवलं. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही," असंही सावंत यांनी म्हटलंय.
 
तानाजी सावंत यांनी म्हटलं की, "हे जनतेच्या मनातले सरकार आणले आहे. हे टाकाऊ सरकार नाही. मीडियाने टीका करायची आणि आम्ही ऐकायचं असं होणार नाही. यापुढे आमच्या कामातून सडेतोड उत्तरं मिळतील."
 
राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न एका महिन्यांच्या आत मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सावंत यांनी दिलं