वृद्ध दाम्पात्याची आत्महत्या
कोल्हापूर मणी खोऱ्यातील वेतवडे (ता.पन्हाळा) येथील महादेव दादु पाटील (वय-७५) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील (वय-७०) या वृध्द दाम्पत्याने आजाराला कंटाळून मंगळवारी रात्री राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.सदर घटनेची कळे पोलिसात नोंद झाली आहे.
घरची परिस्थिती बेताची असणारे महादेव पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई पाटील हे वेतवडे येथील एक गरीब व स्वाभिमानी कष्टाळू वृध्द दाम्पत्य.दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार.पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांना ही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तरीमध्ये ही दिवसभर शेतात राबणे हे या वृध्द दाम्पत्याचे दैनदिन काम.नेहमी प्रमाणे सदर दाम्पत्याने कामे पूर्ण करत मंगळवारी राहत्या घराच्या माळ्यावर जाऊन नायलॉन दोरीच्या साह्याने तुळईला गळफास लावून घेत जीवन यात्रा संपवली.सदर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची बुधवारी सकाळी निदर्शनास आले.याबाबतची माहिती मुलगा आकाराम महादेव पाटील यांने कळे पोलीस ठाण्यात दिली असून सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. हे. कॉ भोसले करत आहेत.
गरीब वृध्द दाम्पत्यानेच मांडला नियतीचा डाव..!
वेतवडे गावात सदर वृध्द दाम्पत्य आण्णा व द्वारका आई म्हणून लहान थोरात परिचयाचे होते.पण या खडतर जीवनाची वाटचाल आता नको होती.त्यामुळेच की काय पाटील दाम्पत्याने जीवनातून कायमचीच एक्झिट घ्यायचे ठरवले. त्यानुसार दोघांनी आपण मयत झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या आदल्या दिवशी मंगळवारी सायंकाळी जागा करुन ठेवली.व अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेऊन त्याच ठिकाणी पाण्याची घागर भरुन ठेवली होती.तसेच गवत व मयताचे साहित्य इत्यादी कामे स्वतःच करुन ठेवल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला होता. जीवनात नियतीच सर्वांच्या बाबतीत डाव मांडत असते पण या दाम्पत्याने स्वतःच नियतीलाही बाजुला ठेवून अखेरचा डाव मांडला आणि जगाचा निरोप घेतला.या गरीब वृध्द दाम्पत्याच्या अशा प्रकारच्या जाण्याने धामणी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.