शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जुलै 2018 (16:35 IST)

नाणार प्रकल्पाविरोधात काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारली? – सुनिल तटकरे

नाणार हा कोकणातील वातावरणाला छेद देणारा प्रकल्प आहे. कोकणातील जनतेच्या दृष्टीने नाणारचा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांची एक भावनिक बाजू आहे. त्यांनी काल काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली?, असा संतप्त सवाल आ. सुनिल तटकरे यांनी सरकारला विचारला. तसेच सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.
 
सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीचे नोटिफिकेशन रद्द करण्याची घोषणा कोकणवासीयांसमोर केली होता. मुख्यमंत्री म्हणतात की ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका वैयक्तिक कशी असू शकते? राज्य सरकार रुल ऑफ डुईंग बिझनेस अनुसार चालणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की नाणारविषयी सुभाष देसाईंचा अभ्यास झाला आहे पण सरकारचा झालेला नाही. ही सरकारमधील विसंगती आहे, अशी टीका त्यांनी केली. कोकणवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे, त्यामुळेच हे घडत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
 
सत्ताधारी पक्षातील आमदार राजदंड उचलतात. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. विरोधी पक्षातील लोकांनी हे केलं असतं तर सदस्याला बडतर्फ करण्याची भूमिका घेतली गेली असती. पण काल खालच्या सभागृहात सदस्यांनी जे केलं त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही असा आरोप तटकरे यांनी केला.
 
नाणारप्रकरणी आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाणारप्रकरणी आमदार सुनिल तटकरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळला त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे काही मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले मात्र त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही नाणारप्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.