रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकरी व बेरोजगारांच्या समस्या सोडवेपर्यंत हल्लाबोल सुरूच राहणार: तटकरे

उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा शेवटचा दिवस आणि शेवटची म्हणजेच एकविसावी सभा चाळीसगाव येथे त्याच उत्साहात, जनतेच्या अलोट गर्दीत संपन्न होत आहे, ही अभिमामाची बाब आहे. शेतकऱ्यांना सरकसकट कर्जमाफी, बोंडअळीला मदत, गारपीटग्रस्तांना मदत, शेतीमालाला हमीभाव अाणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही, तोपर्यंत हल्लाबोल आंदोलन चालूच राहिल, असा एल्गार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केला.
 
पहिल्या टप्प्यात यवतमाळ येथे पहिली हल्लाबोल सभा घेतली होती. तेव्हा वकिलांचे शिष्टमंडळ हल्लाबोल यात्रेत सामील होऊन त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याचप्रमाणेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथे देखील वकिल, बेरोजगार युवक, शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊन भेटले. त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. यावरून हे स्पष्ट होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या मनात पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.
 
खासदार सुप्रिया सुळे  सभेत म्हणाल्या की जळगाव जिल्ह्यात आम्ही तीन दिवसांत नऊ सभा घेतल्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. डॉ. सतीशअण्णा पाटील आणि राजीव देशमुख यांना त्यांच्या मतदारसंघाबद्दल असलेली आस्था, विकासाबाबतचा अट्टहास आणि आदरणीय शरद पवार  साहेबांवरचे प्रेम त्यांच्या प्रत्येक भाषणातून कळत होते.
 
विरोधात असतानाही लोक आम्हाला खुप सारे निवदने देत आहेत. आम्ही सत्तेत नसलो तरी त्यांचा राष्ट्रवादीवर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांना अभ्यास करण्याची फार हौस आहे. कर्जमाफी द्यायची झाली की अभ्यास, आत्महत्या झाल्या की अभ्यास, नुकसान भरपाई द्यायची झाली की अभ्यास. या अभ्यासामुळे गेली तीन वर्षे मुख्यमंत्री एकाच वर्गात आहेत की काय, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे, अशी कोपरखळी त्यांनी मारली.