समाजसेवा करणाऱ्यांना पाठबळ देणे माझा राजधर्म- राजे समरजितसिंह घाटगे
छत्रपती शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे त्या काळात कुस्ती कलेने सुवर्णकाळ अनुभवला. त्यांच्या पश्चात अवकाळा आलेल्या कुस्ती कलेस स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दिलेल्या पाठबळामुळे चालना मिळाली. त्यांचा हाच विचार वस्ताद जयवंत पाटील यांनी आपल्या परीने जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे.लाल मातीच्या सेवेचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना पाठबळ देणे हा माझा राजधर्मच आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
उचगाव ता. करवीर येथील बजरंग आखाड्याचे वस्ताद जयवंत पाटील यांनी राहत्या घरी बालमल्लांसाठी स्वखर्चातून आखाडा उभारून मोफत चालवित असल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रौढांच्या धावण्याच्या स्पर्धेतील यशाबद्दल त्यांच्या पत्नी सौ.अनिता पाटील यांचाही सत्कार केला.
पुढे बोलताना समरजीतसिंह घाटगे म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, खेळाडू, कलाकार यांच्यासाठी काम केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बजरंग आखाड्याच्या माध्यमातून बालमल्लांना मोफत कुस्तीचे धडे देऊन वस्ताद जयवंत पाटील यांनी चांगुलपणा जोपासला आहे.” असे मत व्यक्त केले.
Edited By - Ratnadeep Ranshoor