महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - पाच न्यायाधीशांसमोर सुनावणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतत्त्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठासमोर करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजीच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या मुद्यावर प्रस्तावित सुनावणी देखील 2 दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश रमणा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहे. तत्पूर्वीच घटनापीठातील न्यायमूर्तींची निश्चिती होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार या सुनावणीवर मंगळवारी सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय मंगळवारच्या वेळापत्रकात समाविष्ट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणार्या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदारांना बजावलेल्या नोटिसा, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आदी मुद्यांवर दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एकत्रित सुनावणी केली जाऊ शकते.