सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (16:02 IST)

महाविकास आघाडी सरकारसंदर्भात सुप्रिया सुळेंचं भाकीत; म्हणाल्या, “पाच वर्षे नाही तर…”

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय गोंधळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळे या आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत.आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत दिले जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला आला.त्यावर सुप्रिया सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दात या प्रश्नाला उत्तर देत महाविकास आघाडी सरकारच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात भाष्य केलं.
 
राज्यामधील सरकारसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्षे नाही तर २५ वर्षे राज्याची सेवा करेल असं मत व्यक्त केलं.पत्रकारांनी त्यांना भाजपा आणि शिवसेनेसंदर्भातील प्रश्नही विचारला. दोन्ही पक्षांकडून आम्ही राजकीय विरोधक असून वैरी नसल्याचं भाष्य केलं जात असून दोन्ही पक्षांचे सूर बदलताना दिसतायत असं सांगत एक प्रश्न विचारण्यात आला.तर दुसऱ्या एका प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शुक्रवारी रात्री भेट झाल्याचं कळतंय असं म्हणतं प्रश्न विचारला.
 
या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मी इम्पल्सीव्ह नाहीय.मी लगेच एखाद्या गोष्टीवर कमेंट करत नाही.मी थोडा विचार करण्यासाठी वेळ घेते आणि मग बोलते.मी विचार करुन बोलते त्यामुळे मी लगेच प्रतिक्रिया देणार नाही. तसेच विचारधारा सोडून एकमेकांसोबत चांगले संबंध असतील तर मी त्याचं स्वागतच करेन. माझ्यावर जे संस्कार झालेत त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचा वारसा आहे.त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच मी अशा भेटी होत असतील आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन भेटीगाठी होत असतील तर त्याचं स्वागतच करेन असंही सुप्रिया म्हणाल्या. मागील अनेक महिन्यांपासून नागपूरमधील राष्ट्रवादी कार्यकारणीची बैठक झाली नाही आणि अनेकांच्या भेटी झाल्या नव्हत्या. त्यामुळेच मी दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून पुढील दोन दिवसांमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षासंदर्भातील महत्वाचे निर्णय आणि कामे हतावेगळी करण्याचा विचार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.