बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (23:00 IST)

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे येत्या ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे येत्या ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. दरम्यान, घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. मात्र, भाविकांना कोरोना विषयक नियम पाळावे लागणार आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
 
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.