वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; वालदेवी धरणावर सेल्फी काढताना सहा जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेलेल्या पाच मुली आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. वालदेवी धरणात पिंपळदजवळ सहा जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही मुले 10 ते 26 या वयोगटातील असून, त्यांच्यात पाच मुलींचा समावेश आहे. नाशिकच्या सिडकोतील सिंहस्थनगर परिसरातील ते रहिवासी आहेत. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार 9 ते 10 मुले एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त धरण परिसरात फिरण्यासाठी आली होती.
त्यांच्यातील 6 जण धरणात बुडाल्याचे समोर आले. त्यातील आरती भालेराव, हिंमत चौधरी, नाजीया मणीयार, खुशी मणीयार, ज्योती गमे व सोनी गमे हे सहा जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले, तर समाधान वाकळे व प्रदीप जाधव रा.सिंहस्थनगर, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आणि सना नजीर मणीयार रा. टोयाटो शोरूममागे, पाथर्डीफाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले.
ही मुले रिक्षा आणि दुचाकीवरून धरण परिसरात गेल्याची माहिती मिळाली आहे. धरण परिसरात फिरताना फोटो काढण्यासाठी गेलेल्या या सहाही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.