गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:23 IST)

शिक्षण मंडळानं 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या

maharashatra board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे 10 वी आणि 12 वीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर 15 दिवसांत त्यासंदर्भात संघटना, पालक आणि शिक्षक यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. मग सूचनांचे अवलोकन करून 10वी आणि 12वीचे अंतिम वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.
 
खरं तर कोरोना प्रादुर्भावामुळे 2021ला दहावी, बारावी परीक्षा झालेली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
 
दुसरीकडे CBSE नेही 10वी, 12वीची परीक्षा जाहीर केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांची घोषणा केली आहे. पुढील वर्षी 15 फेब्रुवारीपासून 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर त्यांचे वेळापत्रक पाहू शकतात. CBSE बोर्ड 2023 इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढील वर्षी 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याचं सांगितलंय. विद्यार्थी CBSE बोर्ड 2023 च्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. येथे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा, वेळापत्रक, प्रवेशपत्र आणि इतर तपशीलांची माहिती मिळू शकते.
 
10वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि 21 मार्च 2023 पर्यंत चालणार आहेत. तर इयत्ता 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 5 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहतील. वेळेबद्दल बोलायचे झाल्यास 10वी आणि 12वीच्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होतील आणि दुपारी 1.30 वाजता संपेल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor