शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (20:05 IST)

चुलीवरचं उकळतं पाणी अंगावर पडलं; दोन वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. घरात खेळत असताना अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या दोनवर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जयश्री तुकाराम सिद वय २ वर्ष, रा. कुशेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जयश्री ही दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घरात खेळत होती. त्यावेळी घरातील चुलीवर असलेले उकळते पाणी तिच्या अंगावर पडले यात ती गंभीर भाजल्याने तिला तातडीने वाडीव-हे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला तेथून  जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथे तिच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली .
 
जयश्री भाजल्यानंतर तिला कुठलाही विलंब न करता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला अखेर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि तिची प्राणज्योत मालवली दरम्यान दोन वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने इगतपुरी तालुक्यातील सिद कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर सर्वत्र शोक कळा पसरली आहे. संपूर्ण तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे लहान मुलांवर आता बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना या अगोदर देखील चिमुकल्यांच्या बाबतीत घडल्या आहेत त्यामुळे घरात लहान मुले असताना क्षणाक्षणाला त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.