1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (20:24 IST)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारूप आराखडा 8 हजार कोटींचा

The draft plan
Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून,  आराखड्याचे महापालिका आयुक्तांकडे सादरीकरण केले जाणार आहे.
 
दरम्यान, हा आराखडा प्राथमिक स्वरूपाचा असून, सल्लागार संस्थेच्या नियुक्तीनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
 
२०२७ व २८ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू झाले आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. साधुग्रामच्या जागेचे नियोजन करणे, आरक्षण टाकणे व अधिग्रहण करणे यावर समितीने आतापर्यंत चर्चा केली आहे.
 
त्याचबरोबर आता साधुसंतांना सुविधा पुरविण्यासाठी सिंहस्थ विकास आराखडा तयार करण्याचे काम समितीकडे होते. मागील महिन्यात महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सिंहस्थचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यासाठी ऑगस्टअखेरचा अल्टिमेटम होता.
 
त्यानुसार सिंहस्थ समन्वय अधिकारी व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात बैठक झाली. बैठकीत बांधकाम विभागाने अडीच हजार कोटींचा आराखडा सादर केला. मलनिस्सारण विभागाने ६२७ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा सादर केला आहे.
 
अन्य दहा विभागांना बुधवारपर्यंत अंतिम मुदत होती, त्यानुसार वैद्यकीय विभाग, अग्निशमन, उद्यान, पाणीपुरवठा, जनसंपर्क, घनकचरा विभागाने आराखडा सादर केला आहे. हा आराखडा सव्वापाच हजार कोटीपर्यंत पोचला असून, सर्व विभागांचा मिळून प्रारूप सिंहस्थ विकास आराखडा जवळपास आठ हजार कोटींवर पोचला आहे.
 
शासनाला सादर होणार अहवाल:
कुंभमेळ्यासाठी चार वर्ष शिल्लक असले तरी पायाभूत सेवासुविधा पुरविण्याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे. त्यामुळे सल्लागार संस्था नियुक्त करून अंतिम सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. संस्थेने अंतिम आराखडा तयार केल्यानंतर राज्य शासन व केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे.