मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले; दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिकमध्ये मद्यधुंद कारचालकाने अंबड येथील एक्सलो पॉइंट तसेच प्रणय स्टॅम्पिंग कंपनीसमोरून येत असणाऱ्या पादचारी व दुचाकीवरील नागरिकांना धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
या अपघातात इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी मद्यधुंद कारचालकास पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दीपक कुमार जांगिड ( ४०, रा. पाथर्डी फाटा) हा रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत कार चालवित होता.
त्याचा कारवरील ताबा सुटल्याने (एमएच ०२ सीडी २७९१) एक्सलो पॉइंटवरून वळताना पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिली. या दुचाकीवरून जाणारे प्रवीण महाले (३०, रा. पारोळा, जळगाव) यांना धडक देताच ते खाली पडले. महाले यांच्या डोक्याला जबर मार लाला. जिल्हा रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. यापाठोपाठ याच ठिकाणी पायी जाणारे विलास पोटे, शिवाजी जाधव, महेंद्र जाधव यांनाही या कारचालकाने धडक दिल्याने तेही दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.
हा प्रकार लक्षात येताच परिसरातील काही दुकानदारांनी या चालकाला अडवत कारमधून खाली उतरवत बेदम चोप दिला. तरीही मद्यधुंद चालकाला काहीच सुचत नव्हते. नागरिकांनीच घडलेला प्रकार अंबड पोलिसांना सांगितल्याने त्यांनी कारचालक जांगिड यास ताब्यात घेतले. याप्रकरणी अबंड पाेलिस ठाण्यात जांगिड विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.