शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (10:09 IST)

पूरग्रस्ताना सरकारकडून अर्थसहाय्य, पैसे रोख स्वरूपात देणार

पूरपरिस्थितीचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. या कुटुंबांना शासनाकडून तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यात प्रत्येक कुटुंबला पाच हजार रुपये रोख मंगळवारपासून रोख स्वरूपात देण्यास सुरुवात होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात पूरपरिस्थिती संदर्भातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
म्हैसेकर म्हणाले, नागरिकांची सोय होण्यासाठी पाच हजार रुपये हे रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. सांगली, कोल्हापूरत चलन तुटवडा निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कोणत्याही खातेदाराला पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार नाही. बँकेने पासबुक अथवा चेकचा आग्रह धरू नये यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
 
पैसे वाटपात पोलीस मदत लागली तर ती पुरवली जाईल. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे व्यवहार हे जिल्हा बँकेत आहेत. त्यासाठी एसबीआय बँकेने जिल्हा बँकेला पैसे उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना केल्या आहेत. तर पाणी कमी झाल्यानंतर कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यावरून पुढील काही दिवस केवळ अत्यावश्यक वस्तुपुरवठा करण्यासाठी महामार्गाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल, औषधे यासाठी ही वाहतूक असेल. त्यामुळं सर्वसामान्य वाहन धारकांनी या मार्गावर प्रवास करण्याचा हट्ट धरू नये असे आवाहन देखील डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.