मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (08:42 IST)

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात येणार

कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या कलाकारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली.  शिवसेना आमदारांच्या या आग्रही मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी वृद्ध साहित्यिक, लोककलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. त्याचप्रमाणे भजनी मंडळांचीही नोंद केली जाईल. पावसाळी अधिवेशनाआधी हे प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही दिली.
 
स्थानिक कला सादर करणार्‍या कलाकारांची नोंद तसेच त्यांना आर्थिक सहकार्य करण्याबाबत सर्व आमदारांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेण्यात येतील. व्यापक चर्चा करून मार्गदर्शक तत्व ठरवली जातील व आर्थिक सहकार्याचा निर्णय घेतला जाईल. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विषय मार्गी लावला जाईल, असेही मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
 
प्रतिवर्षी राज्यात २८ हजार सन्मानार्थी कलाकारांना मासिक मानधन मिळत आहे. याकरिता अंदाजे ९० कोटींची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येते. २०२१ साली काढलेल्या शासन निर्णयात मुंबई शहर, उपनगर, ठाणे व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी २००० आणि उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी १५०० कलावंतांना अशा एकूण ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी ५००० प्रमाणे एकूण २८ कोटी व प्रयोगात्मक कला सादरीकरण करणार्‍यांना ८४७  समूह, पथक, फड यांना एकूण ६ कोटी एक रकमी मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.