शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (14:01 IST)

डॉ. तात्याराव लहानेंवर अनधिकृतपणे शस्त्रक्रिया केल्याचा चौकशी समितीचा ठपका, अहवालात नेमकं काय म्हटलंय?

नामांकित नेत्रचिकित्सातज्ज्ञ पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर अनधिकृत (शासनाची ऑर्डर नसताना) शस्त्रक्रिया केल्याचा ठपका ठेवला आहे.
या चौकशी अहवालानुसार, "सरकारची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना डाॅ. लहाने यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या."
 
'698 शस्त्रक्रिया अनधिकृत'
बीबीसी मराठीला जेजे रुग्णालयातील वरि‌ष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या या समितीच्या चौकशी अहवालानुसार, "डाॅ. तात्याराव लहाने यांनी सरकारच्या मान्यतेशिवाय किंवा कुठलीही ऑर्डर नसताना 698 शस्त्रक्रिया केल्या आहेत."
 
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी डाॅ. तात्याराव लहाने, नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डाॅ. रागिणी पारेख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमली होती.
 
या समितीने आपला चौकशी अहवाल 12 जून रोजी सादर केला आहे.
"डाॅ. तात्याराव लहाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे (DMER) संचालक म्हणून नीवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाचे समन्वयक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी या मधल्या काळात कोणतीही ऑर्डर नसताना डाॅ. लहाने यांनी या 698 शस्त्रक्रिया केल्याचं समितीच्या अहवालात आढळून आलं आहे," अशीही माहिती जेजे रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 
या चौकशीसाठी समितीने जेजे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याची माहिती समोर आली आहे.
 
या अहवालानंतर जेजे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून त्यावेळी विभागाच्या प्रमुख असलेल्या डाॅ. रागिणी पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं जाऊ शकतं.
 
कोणतीही अधिकृत परवानगी नसताना डाॅ. पारेख यांनी डाॅ. लहाने यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी कशी दिली? याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागवलं जाण्याची शक्यता आहे.
 
डाॅ. लहाने यांचं म्हणणं काय आहे
डाॅ. लहाने यांनी मात्र चौकशी समितीतीच्या अहवालातील हे मुद्दे फेटीळले आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना डाॅ. लहाने म्हणाले, "मी एकही शस्त्रक्रिया व्हॅलीड ऑर्डरशिवाय केलेली नाही."
 
"चौकशी समितीला व्हॅलीड ऑर्डर लक्षात आलेली नसावी त्यांच्याकडून ओव्हरलूक झाली असावी असं वाटतं. पण एकही शस्त्रक्रिया अधिकृत ऑर्डरशिवाय केलेली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
यापूर्वी जेजे रुग्णालयाच्या प्रशासनाने डाॅ. तात्याराव लहाने यांचे पुत्र डाॅ. सुमीत लहाने यांच्या संदर्भातही चौकशी केली होती.
डाॅ. सुमीत लहाने यांचं जेजे रुग्णालयात कोणतीही पोस्टिंग नसताना त्यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप होता.
गेल्या महिन्यात 22 मे रोजी जेजे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागातील 28 निवासी डाॅक्टरांनी या प्रकरणाविरोधात तक्रारी नोंदवत संप पुकारला होता.
 
विभागात अनधिकृतपणे शस्त्रक्रिया केल्या जात असून निवासी डाॅक्टरांना मात्र शिकण्याची संधी दिली जात नाही, असा या डाॅक्टरांचा आक्षेप होता.
 
निवासी डाॅक्टरांच्या या संपाला केंद्रीय मार्डनेही (निवासी डाॅक्टरांची देशपातळीवरील संघटना) पाठिंबा दिला होता.
निवासी डाॅक्टरांनी गंभीर आरोप केल्यानंतर डाॅ. लहाने यांच्यासह 8 डाॅक्टरांनी राजीनामे दिले होते.
3 जून रोजी सरकारने पत्रक जारी करत डाॅ. लहाने यांचा राजीनामा स्वीकारत आहोत असंही स्पष्ट केलं.
तसंच डाॅ. रागिणी पारेख यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आणि त्यांचीही विनंती सरकारने मान्य केली.
 
सरकारने डाॅ. लहाने यांचा राजीनामा आणि डाॅ. पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर केल्यानंतर निवासी डाॅक्टरांनी आपला संप मागे घेतला.
 
यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, "लहाने सर यांचं योगदान आम्हाला नाकारता येणार नाही. पण मुलांचं शैक्षणिक नुकसान हेसुद्धा टाळता येणार नाही."
 
"25 वर्षांच्या हुकूमशाहीचा आज अंत झाला, आमच्या बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत. डाॅ. लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांचा राजीनामा स्वीकारून पदावर नवीन जागा भरण्याची मागणी होती ती सरकारने मान्य केलेली आहे," असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं.
 
शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाल्यानं मी उद्विग्न झालोय - डॉ. लहाने
डॉ. तात्याराव लहाने यांनी काही दिवसांपूर्वी निवासी डाॅक्टरांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी
 
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली.
 
डॉ. लहाने म्हणाले होते, "आजही रुग्णालय प्रशासनाने आमची बाजू ऐकून घेतलेली नाही. रुग्ण तपासणे आणि त्यांची हिस्ट्री लिहिणं निवासी डॉक्टरांना कारकुनी काम वाटतं. एका वर्षापूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांना काही शस्त्रक्रिया करायला देतो."
 
"आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाला. हे ऐकून मी उद्विग्न झालो. आम्ही 30 पिढ्या घडवल्या."
 
आमचा एकेरी उल्लेख करतात, असं म्हणत डॉ. लहाने पुढे सांगतात की, "इथे बसलेले सर्व डॉक्टर प्रत्येकी एका पीजी विद्यार्थ्याला गाईड करतात. तरीही आरोप केला जातो. हे दु:खद आणि क्लेषदायक आहे. गरीब रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे येतात. आम्ही गेल्या 36 वर्षांपासून त्यांना दृष्टी देत आहोत. आमच्यासमोर त्यांची दृष्टी जाण्यापेक्षा आम्ही राजीनामा दिला. आम्ही कोणाच्याही शस्त्रक्रिया चोरलेल्या नाही. जेजे रुग्णालयात आम्हाला परत जायचं नाही."
 
Published By- Priya Dixit