शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (08:32 IST)

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने दिले निमंत्रण : मुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा

eknath shinde
पंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा 29 जून रोजी आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचे निमंत्रण मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी निमंत्रण स्वीकारले असून ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरीत येणार आहेत.
 
राज्य शासन व प्रशासनाकडून आषाढी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मंदिर समितीकडूनही जय्यत तयारी सुरू आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी मुंबई येथे भेटून देण्यात आले.
 
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेचे सदस्य अॅड. माधवी देसाई-निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सुधीर घोडके आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन तसेच पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
 
आषाढी यात्रा सोहळ्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. त्यांनी भाविकांसाठी जादा पाच हजार एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तर भाविकांना उन्हाचा व उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा तैनात केली जात आहे. तर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी पत्राशेड उभारून सावली तयार करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
 
कॉरिडॉरची घोषणा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेच्या दिवशी श्री विठ्ठल-ऊक्मिणीची शासकीय महापूजा करणार आहेत. मंदिर व परिसरातील भागांचा विकास करण्यासाठी शिंदे व फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. यात्रा काळात 15 लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती पंढरपुरात असते. मंदिर व पंढरपूर शहराच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कॉरिडॉरविषयीची घोषणा किंवा प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण राज्याच्यादृष्टीने कॉरिडॉर हा विषय महत्त्वाचा आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor