शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2024 (13:12 IST)

लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांची तहान भागविणा-या मांजरा प्रकल्पात पाणी साठा घटतोय

water draught
लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांची तहान भागविणा-या मांजरा प्रकल्पात पाणी साठा घटतोय , पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची परिस्थिती लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांची तहान भागविणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ १८.८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

निम्न तेरणा प्रकल्पात २१.५१ टक्के तर जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत फक्त १८.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून येत्या काही दिवसांत जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
लातूर जिल्ह्यासह धाराशिव, बीड जिल्ह्यात यावर्षी वार्षीक सरासरी एवढाही पाऊस पडला नाही. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांना पाणी पुरवठा होणा-या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा झाला. या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यावर लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातील २१ पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत.

या योजनांना पाणीपुरवठा करण्यात येत असताना आता उन्हाचाही चटका वाढत आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत चालला आहे. उन्हामुळे प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन पाणीसाठा कमी होत आहे. मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ १८.८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
 
लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प, तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, मसलगा आणि घरणी हे आठ मध्यम तर १३४ लघू असे एकुण १४४ प्रकल्प आहेत. या सर्वच प्रकल्पांतील पाणीसाठ्याची पूर्ण संचय क्षमता ८४४.६५१ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.

त्यातील मृत साठ्याची क्षमता १३९.६५१ दशलक्ष घनमीटर आहे. जिल्ह्यात आजघडीला एकुण १२९.५२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मृत पाणीसाठा ९८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा पाऊस जेमतेम झाल्याने प्रकल्पांत पाणीसाठाच झाला नाही. उलट आहे ते पाणी कमी होत गेले. आता तर बाष्पीभवनाचीही भर पडत आहे.

मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा ४४.८१५ दशलक्ष घनमीटर आहे. त्याची टक्केवारी १६.७१ एवढी आहे. आठ मध्यम प्रकल्पांत २१.७२४ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच १७.७८ टक्के पाणीसाठा आहे. १३४ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा ६३.७९१ दशलक्ष घनमीटर म्हणाजेच २०.३० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत १३०.३३० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १८.५० एवढी आहे.
 
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कमी पावसामुळे पाणीसाठाच झाला नाही. त्याचप्रमाणे भूगर्भाची पाणीपातळीही कमालीची खालावली आहे. मागील सात वर्षानंतर पाणीपातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे मार्च महिन्यानंतर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आह. प्रशासनाने काळाची पावले ओळखून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण जिल्हाभर तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची वेळ येऊ शकते.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor