रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 मे 2023 (08:39 IST)

कुकडीच्या पाण्यासंदर्भात निर्णय झालाय तरीही पाणी अजून सुटले नाही, पण रोहित पवार गप्प का

rohit panwar
कुकडीच्या पाण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मे रोजी पाणी सुटणार असे घाईघाईने ट्वीट करणारे आमदार रोहित पवार आज 24 मे उजाडले तरी पाणी आलेले नाही, पण ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी केली.
 
कर्जत-जामखेड व करमाळासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीत झाला आहे. या संदर्भात प्राध्यापक राम शिंदे यांनी वास्तव मांडून आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 22 रोजी सुटणारे पाणी 24 रोजीही सूटलेले नाही, यावर रोहित पवार बोलणार की नाही ?, असा सवालही प्राध्यापक शिंदे यांनी केला.
 
ते फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह
या संदर्भात बोलताना प्राथमिक शिंदे म्हणाले की, आमदार रोहित पवार फक्त सोशल मीडिया करतात. पालकमंत्री पाटील यांनी घेतलेल्या बैठकीच्या दिवशी त्यांनी त्या बैठकीचा फोटो ट्विट केला व त्या फोटोतून माझा फोटो कट केला व एकदम तातडीने ट्विट केले की पाणी 22 रोजी सुटणार आहे, पण आज 24 तारीख उजाडली तरी पण पाणी आले नाही व पवार यावर काही बोलत नाहीत.
 
याचे कारण म्हणजे ते कर्जत-जामखेड चे प्रतिनिधित्व करतात, पण ते मूळचे राहणारे पुणे जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे पुणेकरांनी विरोध केला तर त्यावर बोलायचे नाही. त्यांच्या तीन वर्षाच्या काळात कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जेव्हा बोलायचे तेव्हा ते बोलत नाहीत व जेव्हा नाही बोलायचे तेव्हा ते बोलतात,
 
अशी टीका करून प्राध्यापक शिंदे म्हणाले, तुम्ही 22 रोजी पाणी सुटेल असे बोलले असताना त्यादिवशी पाणी सुटले नाही तर त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते. आज कर्जत, जामखेड व करमाळा भागात पाणी नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.
 
आता तोंड लपवत आहेत
यांचेच आमदार पाणी सोडायला वरती विरोध करतात व हे मूग गिळून गप्प बसले आहेत व आता तोंड लपवत आहेत, असा आरोप करून शिंदे म्हणाले, त्यांच्याच पक्षाचा एक आमदार खालच्या शेतकऱ्यांना पाणी देण्यास विरोध करतो व वेठीस धरत असेल तर यावर पवारांनी बोलले पाहिजे.
 
पाणी सुटणार होते तेव्हा घाईघाईने ट्विट केले व आता पाणी सुटले नाही तर काहीच बोलत नाही. त्यामुळे ही पवारांची अडचण नाही तर नौटंकी आहे. त्यांच्या मनात पाप आहे, असा दावाही शिंदे यांनी केला. राहायचे एकीकडे, निवडून आले दुसरीकडे. ज्या भागात राहतो, त्या भागाचे लांगुलचालन करायचे व जेथून निवडून आलो, तेथील लोकांना वेठीस धरायचे व बनवाबनवी करायची, हे आता लोकांनी ओळखले आहे,
 
असा दावा करून प्राध्यापक शिंदे म्हणाले, चंद्रकांत दादांच्या बैठकीचा फोटो ट्विट केला, त्यातून आम्हाला कट केले व 22 ला पाणी सुटेल असे जाहीर करता, पण ते सुटले नाही तर त्यावर बोलत का नाही? ज्यांचे प्रतिनिधित्व करता, त्यांच्या हिताबद्दल बोलले नाही तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील किंबहुना लोकांनी तुम्हाला आता लक्षात ठेवलेलेच आहे, असा दावाही प्राध्यापक शिंदे यांनी पवार यांच्यावर टीका करताना केला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor