वाढीव वीजदेयकांबाबत दिवाळीपर्यत दिलासा मिळणार
कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीज वापरामुळे आलेल्या वाढीव वीजदेयकांबाबत दिलासा देण्याविषयी चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोना कालावधीमध्ये सतत घरामध्ये राहावे लागल्यामुळे जास्त वीजवापराने अधिकची वीजबिले आली. त्यामुळे या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याच्या मागणीनुसार मुंबईसह राज्यातील कोटय़वधी वीजग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत गोड बातमी मिळू शकते, असे राऊत म्हणाले.
मी ऊर्जामंत्री झाल्यापासून ० ते १०० युनिट वीज मोफत देण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासंदर्भातील नियाेजन करण्यात येत आहे. वीजपुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही अडथळ्याविना सलग ४ तास व्यवस्थित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.