शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (21:07 IST)

मालेगांव मॅजिक’ संदर्भात शास्त्रीय संशोधन होणार

कोविड-19 च्या अनुषंगाने ‘मालेगांव मॅजिक’ संदर्भात शास्त्रीय संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. विद्यापीठाच्या कुलगुरु यांच्या समवेत मालेगांव येथे जिल्हाधिकारी डॉ. सूरज मांढरे,महापौर ताहेरा शेख,आयुक्त भालचंद्र गोसावी, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर व अधिकारी यांच्या समवेत  आढावा बैठक संपन्न झाली.
 
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, सर्वत्र ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतांना मालेगांव येथील रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. यासंदर्भात शास्त्रीय कारणमीमांसा शोधून काढणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे चार संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व अभ्यांगत यांचे पथक नेमण्यात आले असून ते पुढील पंधरा दिवसात सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणात संगणकीकृत पध्दतीने रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून सर्व माहितीचे निष्कर्ष काढल्यानंतर शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी यासंदर्भात सांगितले की, कोविड-19 संदर्भातला विद्यापीठाचा संशोधनात्मक उपक्रम आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करणे गरजचे आहे. या संशोधन अभ्यासासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. आयुष मंत्रालयांतर्गत येणारे युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद , अॅलोपॅथी डॉक्टरांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमात विद्यापीठाचे मालेगाव व धुळे येथील विविध विद्याशाखांचे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.