म्हणून या पक्षातील नगरसेवक,पदाधिकारी यांना पोलिसांच्या नोटीस
राज्यातील कायद्या सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये देखील काही काही शिवसैनिकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे. शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक बाळा दराडे आणि दीपक दातिर यांना देखील पोलिसांकडून नोटिस पाठविण्यात आली आहे.
राज्यासह नाशिकमध्ये देखील सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्याचे पडसाद उमटले आहेत. अशात शहरात कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. सत्तांतर झाल्यास राज्यात शिवसेना भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून कायद्या सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नोटिसा बजावल्या जात आहे. राज्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती असल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ही पाऊलं उचलली जात आहे.
एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिंदेंना समर्थन आणि विरोध दोन्ही पाहायला मिळालं. राज्यात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करून, फोटोला काळं फासून, तर कधी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बंडखोरांबद्दल असलेला रोष व्यक्त केला. तर याउलट शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरत शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैचा नारा देत, पोस्टरबाजी करत समर्थन दर्शवलं आहे. राज्यातील हे चित्र पाहता शिवसैनिक विरुद्ध शिंदे समर्थक असे दोन गट तयार झाले आहे. त्यातल्या त्यात अप्रत्यक्षरीत्या आपल्याला भाजपाचा पाठिंबा असल्याच वक्तव्य शिंदेंनी केलं होतं.
अशात सत्तांतर झाल्यास राज्यात शिवसेना-भाजप असा संघर्ष तयार होऊन त्याचा धक्का शांतता आणि सुव्यवस्थेला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर राज्यासह नाशकातही पोलिस प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.