शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव आहे : भास्कर जाधव
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव आहे, असा आरोप भास्कर जाधवांनी यावेळी केला.
विधानसभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “एकनाथरावजी शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढवत आहेत. यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, याठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील. आणि संपेल ती फक्त शिवसेना संपेल,” असंही जाधव म्हणाले.
भाजपावर टीका करताना भास्कर जाधव पुढे म्हणाले, “यांचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर शिवसेना संपवणं हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची? यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, ही एवढीच भावना व्यक्त करतो,” असंही जाधव म्हणाले.