1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (20:56 IST)

सव्वा तीन कोटी रुपयांचे दागिने पळवणाऱ्या तिघांना अटक

arrest
ठाणे  :- उल्हासनगरमधील झवेरी बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून 3 कोटी 20 लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घोडबंदर रोड येथून अटक केली आहे.
 
दिनेश उर्फ सागर चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल आणि दीपक रामसिंग भंडारी (सर्व राहणार नेपाळ) अशी या चोरांची नावे आहेत. या आरोपींच्या नावावर मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उप आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
 
उल्हासनगरमधील झवेरी बाजारात असलेल्या ज्वेलर्स दुकानात 26 जून 2023 रोजी 3 चोरांनी दरोडा टाकला होता. या चोरांनी दुकानातून 6 किलो सोन्याची चोरी केली. भर बाजारातील दुकानात चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतल्याचे समोर आले. हे चोर दोन महिन्यांनंतर पुन्हा ठाण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे या तिन्ही आरोपींचा शोध घेतला.
 
ज्वेलर्स दुकानाच्या संरक्षणासाठी एका दाम्पत्याला चौकीदार म्हणून ठेवले होते. या चौकीदारानेच चोरांना माहिती दिली. चौकीदाराच्या माहितीच्या आधारे आरोपींनी तब्बल 6 किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. या दागिन्यांची किंमत 3 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. चोरांना अटके केल्यानंतर तिघांंनी गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखा मालमत्ता शाखेच्या पोलीस पथकाने या आरोपींकडून 33 लाख रुपयांचे 550 ग्राम सोने जप्त केले आहे. या चोरीमध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीत 11 सदस्य असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी 8 आरोपी अद्याप फरार आहेत.
 
या टोळीची चोरी करण्याची वेगळी पद्धत होती. चोर विविध ठिकाणी नोकरी करून रेकी करायचे. त्यानंतर चोरीची योजना आखायचे. चोरी केल्यानंतर हे चोर थेट नेपाळ या देशात आश्रय घ्यायचे. नेपाळमध्ये गेल्यानंतर ते पुन्हा तीन ते चार महिन्यानंतर  शहरात दाखल व्हायचे. त्यामुळे या चोरांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होते.