सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (10:11 IST)

पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरणार, जनावरे गमावणाऱ्या पशुपालकांना अर्थसहाय्य

lumpy virus
राज्यासह देशात अनेक दिवसांपासून पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी चर्मरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविल्या जात आहेत. राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. पशुपालकांना शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती व्हावी, त्यांचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक आहे.
 
पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरणार, जनावरे गमावणाऱ्या पशुपालकांना अर्थसहाय्य.
लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. शासनाने राज्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. लम्पी चर्मरोग राज्य शासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनेमुळे घटत आहे. राज्यात सध्या बाधित पशुधनापैकी 50 टक्के पशुधन उपचाराने बरे झाले आहे. संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांत या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाच्या सूचनाप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरणार, जनावरे गमावणाऱ्या पशुपालकांना अर्थसहाय्य.
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण करण्याकरिता पशुधन पर्यवेक्षकाची 286 रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची 873 अशी 1159 पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
 
अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई
शासनाने सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, लम्पी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. हा रोग माशा, डास, गोचिड इ. कीटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी आणि सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटींचा निधी
लम्पी चर्मरोगावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी चर्मरोगावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता छात्र (ईंटर्नीज) यांना 5 रुपये प्रति लसमात्राप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor