1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (07:29 IST)

समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी चालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’चाचणी होणार!

To prevent accidents
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नुकताच झालेल्या बस अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला होता. बसचालकाने मद्यपान केल्याच्या कारणाने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मग यातूनच धडा घेऊन समृध्दी महामार्गावर मद्यपी चालकांना पायबंद घाला अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. त्यावर समृध्दीवरून प्रवास करणा-या सर्व मोठया वाहनांच्या चालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी केली जाईल असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिले.
 
समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला होता. त्या मुद्यावर अर्धा तास चर्चेच्या सूचनेवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी समृध्दीवर होत असलेल्या अपघातांचा मुद्या उपस्थित केला. पहिल्या शंभर दिवसांतील अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. समृध्दीवरून वेगाने गाड्या जातात. मालगाड्याही फास्ट लेनवरून वेगाने जात असतात. विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक मद्यपान करून बस चालवत होता. महामार्गावर बस चालवणारे व खासगी वाहन चालक मद्यपान करून येत असतील आणि दुर्घटना होत असतील तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. वैमानिकाची जशी विमान उड्डाणाच्या आधी ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी होते तशी चाचणी या महामार्गावरील हेवी वाहन चालकांची करावी अशी मागणी त्यांनी केली. मद्यपी चालकांची तपासणी करून तातडीने त्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजे तसेच कॅमेरे बसवा किंवा हायवे पेट्रोल सुरू करा, असे चव्हाण म्हणाले.
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे म्हणाले, ड्रायव्हरची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी केल्याशिवाय त्याला महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. लेन तोडणा-या वाहनांवरही कारवाई करण्यात येत आहे असे ते म्हणाले. आतापर्यंत समृध्दीवरून ३३ लाख वाहनांनी सुरक्षित प्रवास केला आहे. भविष्यात या महामार्गावर सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे.
 
अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणा-या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेत असेही भुसे यांनी सांगितले.