पानेवाडीतला टँकर ट्रान्सपोर्टरच्या चालकांचा संप मागे, इंधनाचा पुरवठा पूर्ववत
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपीसीएल या तिन्ही ऑइल कंपनी मध्ये टँकर ट्रान्सपोर्टरच्या चालकांनी अचानक पुकारलेला संप मागे घेतला आहे. सोमवारी या संपामुळे नाशिक, धुळे, जळगाव नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली होती. सोबत पेट्रोल, डिझेल व्यतिरिक्त गॅसचाही पुरवठा खंडित झाला होता. मात्र चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला असून, टँकर रस्त्यात उभे राहणार नाही असे आश्वासन देण्यात आले, त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
दरम्यान, नांदगाव रस्त्यावर नागापूर ते पानेवाडी दरम्यान दुतर्फा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपीसीएल कंपन्यांच्या प्रकल्पातून इंधन वाहतूक करणारे टँकर उभे केले जातात. नागापुर ग्रामस्थ आणि टँकर चालक यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. यात ऑइल आणि गॅस डेपोच्या आतमध्ये टँकर उभे करणे अपेक्षित आहे. मात्र, टँकर सर्रास डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभे केलेले असतात. त्यामुळे नागापुर ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरच मोठ मोठे टँकर उभे असल्याने आपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच ज्या टँकर मध्ये डेपो मधून इंधन भरले आहे आणि त्या टँकरने नियोजित पेट्रोल पंप कडे जाणे अपेक्षित आहे. ते टँकर देखील डेपोच्या बाहेरच उभे असतात. त्यातून अपघात तसेच टँकर मधून डिझेल, पेट्रोल चोरीच्या घटना देखील झाल्या आहेत.
यातच रविवारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेपो समोर एका टँकरचा नागापुर ग्रामस्थ वाहन चालकाला धक्का लागल्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट डेपो समोर उभ्या असलेल्या अनेक टँकरच्या काचा फोडल्या. तसेच गॅस प्लांट मधून बाहेर येत असलेल्या एका टँकर चालकालाही मारहाण केली. या घटनेनंतर टँकर चालकांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, नाशिक सह उत्तर महाराष्ट्र आणि मारठवड्यातील अनेक जिल्ह्यातील इंधनाचा पुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान पोलीस प्रशासन , कंपनी अधिकारी , ग्रामस्थ आणि वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात टँकर भरलेले असो किंवा रिकामे ते इंधन कंपनीच्या पार्किंगमध्येच उभे राहातील असा निर्णय झाला. त्यानंतर संप मागे घेत वाहतूक पूर्ववत सुरु झाली.