गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2024 (10:34 IST)

मुंबई फेस्ट‍िव्हल 2024’ करिता नोंदणीचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

girish mahajan
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये  20 ते 28 जानेवारी 2023 दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा समाविष्ट असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
 
मंत्री श्री. महाजन म्हणाले की,राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्ट‍िव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे मुंबईत शहर व उपनगरातील विविध विभागात आयोजित करण्यात येणार आहे. दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. राज्य शासन आणि मुंबई महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली सल्लागार समिती देखील गठित करण्यात आली आहे.
 
या महोत्सवात राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायकलिंग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्ट‍िव्हीटीज्,  पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्ट‍िव्हल याअंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दररोज विविध कार्यक्रम आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे, असेही पर्यटनमंत्री श्री. महाजन यांनी म्हटले आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor