मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (08:05 IST)

'आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे'

नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूरकरांनी आगळावेगळा निरोप दिला. नागपुरातील शासकीय निवासस्थानातून मुंबईकडे रवाना होत असताना नागरिकांनी मुंढे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तर काही तरुण मुंढे यांनी नागपूर सोडू नये म्हणून त्यांच्या गाडीसमोर आडवेही झाले होते. तर अनेक जण त्यांच्या गाडीमागेही धावत होते. नागपूरकरांचा हात जोडून नमस्कार करत तुकाराम मुंढे यांनी त्यांचा निरोप घेतला. तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी 'We Want Munde Sir' तसंच 'आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे' अशा घोषणा दिल्या.
 
नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते. त्याकरिता त्यांना निरोप देण्यासाठी गुरुवारपासूनच त्यांच्या घरी रांग लागली होती. कुणी पुष्पगुच्छ आणत होते तर कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते. कुणी त्यांना राखी बांधत होते तर कोणी भेटवस्तू आणत होते. जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत होता. 
 
बघता बघता गर्दी वाढू लागली. तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हेवेत निनादू लागल्या. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी हजर झाले होते. पोलीस बंदोबस्त देखील तगडा होता. शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले. त्यांनी उपस्थित नागरिकांना अभिवादन केले व ते गाडीत बसले. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. मी तुकाराम मुंढे, आय सपोर्ट तुकाराम मुंढे, माय रियल हिरो तुकाराम मुंढे अशा आशयाचे अनेक फलक त्या ठिकाणी झळकत होते. तर काही तरुण ‘आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा देत होते. मात्र, गर्दी पाहून मुंढे तिथे थांबले नाहीत. ते फक्त लोकांना अभिवादन करत होते. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले. त्यांचा स्वीकार त्यांनी केला आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.