शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (16:45 IST)

त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे : उदयनराजे

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. संभाजीराजे यांनी गुरुवारी कोल्हापुरात १६ जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर आज पुणे किंवा साताऱ्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज ही भेट झालेली नसून येत्या तीन ते चार दिवसांत ही भेट होणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे.
 
“माझ्या अगोरदच काही भेटीगाठी काही ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकणार नाही,” असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं.
 
“ते माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू. त्यावेळी चर्चेतून चांगलं काहीतरी घडेल,” असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.