उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण २३ जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. घरी आलेल्या पाहुण्यांचं अगत्य करणं हे ठाकरे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहेत. कृष्णकुंजवर त्याचा अनुभव आला. राज ठाकरेंनी आमच्यासोबत १०-१२ मिनिटं संवाद साधला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या,' असं पेडणेकर राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या.