Uddhav Thackeray reaction on Sharad Pawar book “मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं आहे हे जगजाहीर आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या बद्दल लिहिलेल्या मजकुरावर दिली आहे.
तसंच राजीनाम्यानंतरशरद पवार यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झाली नसल्याचंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडून महाविकास आघाडीच्या एकीला तडा जाईल असं काही होणार नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवाय वज्रमुठ सभांच्या तारखा बदलत आहोत, लोक सभांसाठी दुपारपासून येतात, त्यामुळे उन्हाळा पाहाता या सभांच्या तारखा बदलणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
बारसूबाबत बोलताना “समजा प्रकल्प चांगला असेल आणि लोकांनी होकार दिला तर मी मध्ये का यावं, पण आता लोकांचे प्रश्न आहेत. ते तिथले भुमीपुत्र आहेत त्यांना त्यांची उत्तर मिळाली पाहिजेतच,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
शरद पवार पुस्कात नेमकं काय म्हणालेत?
शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरेंबाबत तीन खंत व्यक्त केल्यात.
पहिली खंत – उद्धव ठाकरे मंत्रालयात फार कमी उपस्थित राहायचे. त्यावरून विरोधकही उद्धव ठाकरेंना निशाणा बनवायचे. यावर शरद पवारांनी आत्मकथेत म्हटलंय की, “उद्भवना भेडसावत शारीरिक काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं.”
दुसरी खंत – उद्धव ठाकरेंशी कसा संवाद व्हायचा, हे सांगता शरद पवारांनी म्हटलंय की, “बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे.”
तिसरी खंत – महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी उद्धव ठाकरेंबाबत एक खंत व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंनी संघर्ष केला नसल्याचं पवारांनी नोंदवलंय.
पवारांनी आत्मकथेत म्हटलंय की, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्त्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.”
मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही कारण... - जयंत पाटील
मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, कारण माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.
आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींविषयी माहिती दिली.
पाटील म्हणाले, “मी आजपर्यंत महाराष्ट्रात काम केलेलं आहे. ती सोडून मला दिल्लीतील जबाबदारी स्वीकारता येणार नाही. मी दिल्लीत काम केलेलं नाही, तिथे माझ्या ओळखीही नाहीत. अशा जबाबदाऱ्या संसदेत काही वर्षे काम केलेल्या व्यक्तीने पार पाडायच्या असतात. शरद पवारांना तो अनुभव आहे. म्हणून ते देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले.”
“शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर नेते निराश झाले आहेत. नेते-कार्यकर्ते त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा याबाबत आग्रही आहेत, पण शरद पवार निवृत्ती घेण्यावर ठाम आहेत. पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
शरद पवार अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील, ते अध्यक्ष नसतील तर आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का, अशी भावना लोकांची झाली आहे. त्यामुळे ते आम्हाला राजीनामे पाठवत आहेत, असं पाटील यांनी म्हटलं.
माझी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा नाही – प्रफुल्ल पटेल
“मी पक्षाचं अध्यक्षपद घेण्यासाठी तयार नाही, माझ्याकडे आधीपासून खूप काम आहे. माझी अध्यक्ष होण्याची इच्छा नाही,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
तसंच “आज शरद पवार नेहमीप्रमाणे वाय. बी. चव्हाण सेंटरला आले. आज कोणतीही बैठक नव्हती. आज सर्व नेते पवारांना भेटण्यासाठी आले होते. शरद पवार यांनी अद्याप कोणताही निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा विचार केला नाही. ना आज कुठली बैठक झाली ना आज कुठला निर्णय झालेला आहे. अजूनही शरद पवार यांनी त्यांच्या मनात काय आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे कुठल्याही आफवा पसरवू नका. शक्यतांवर चर्चा करू नका,” अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्तदेखील पटेल यांनी फेटाळून लावलं आहे. बैठकीचा निमंत्रक मी आहे त्यामुळे मीच अधिकृत सांगू शकतो, असंसुद्धा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
तसंच जयंत पाटील यांचा कुठलाही नाराजीचा सूर नाही. त्यांच्या कारखान्याची पुण्यात मिटिंग होती, त्यासाठी ते पुण्याला गेले होते. संध्याकाळी ते परत येतील. आज कुठलीही बैठक नव्हती, असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
शिवाय वज्रमूठ सभा पुढे ढकलल्या जाण्याचा निर्णय आणि शरद पवार यांच्या निवृत्तीचा काहीही संबंध नाही. वाढत्या उन्हामुळे सर्व नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांनी एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे.
नव्यांना संधी द्यायची असेल तर आम्हाला हटवून इतरांना संधी द्या, असंही जितेंद्र आव्हाड आज पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.
दरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसंदर्भात एका समितीचा उल्लेख केला होता. या समितीची बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल लोक माझा सांगातीच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर सभागृहातच त्यांच्या या निर्णयाला पक्ष पदाधिकाऱ्यांनी विरोध केला.
पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांभोवती गराडा घालून हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ माजल्याचं दिसून येत आहे.
काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं बैठकींच सत्र सुरू होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक वाय. बी. चव्हाण सेंटरच्या सभागृहात सुरू आहे.
दरम्यान, आज आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नसल्याचं वृत्त आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीनंतर त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी काही माध्यमांमध्ये सकाळपासून देण्यात येत होती. पण दुपारहून त्यांनी आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे.
या सगळ्या घटनाक्रमादरम्यान विविध प्रकारच्या बातम्या आणि अफवांना पेव फुटल्याचं दिसून येत आहे.
एका माध्यमातील बातमी आणि चर्चेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रातील धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे तर राज्यातील धुरा अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे.
अर्थात, ही बातमी सूत्रांच्या माहितीनुसार देण्यात आली असून अद्याप याची अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करता येऊ शकलेली नाही.
दरम्यान, ताई केंद्रात, दादा राज्यात असं वक्तव्य भुजबळ यांनी आज सकाळी केलं होतं, पण ते आपलं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवाय, आज शरद पवारांनी सूचवलेल्या समितीतील सदस्यांची कोणतीही बैठक नव्हती, असं स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिलं.
"आज कमिटीची कोणतीही बैठक नव्हती. आमचे काही सहकारी पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. 1-2 दिवसांत अशी बैठक होईल. तोपर्यंत साहेबांचं मन वळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत," असं भुजबळ यांनी म्हटलं.
"काही नेते हे बाजार समितीच्या नियुक्त्या, साखर कारखान्याची कामं यासाठी मुंबईबाहेर आहेत त्यामुळे काही नेते अनुउपस्थित आहेत," असंही भुजबळ यांनी सांगितलं.
'मला बैठकीला बोलावण्याची गरज वाटली नसेल'
माध्यमांमधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीबद्दल बातम्या येत असतानाच जयंत पाटील हे बैठकीला अनुपस्थित असल्याची बातमीही येत होती.
पुण्यात माध्यमांनी जयंत पाटील यांच्याशी याबद्दल संवाद साधला.
त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, तुम्ही मला विचारलं की आज मुंबईत बैठक आहे, त्याला तुम्ही गेला नाही? मी म्हटलं की, मला त्याबद्दल काही माहीत नाही. तुम्ही विचारलं की, तुम्हाला बैठकीला बोलावलं नव्हतं का? मी म्हटलं की, त्यांना मला बोलावण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक बैठकीला प्रत्येकाला बोलावलंच पाहिजे असा आग्रह नसावा.
जयंत पाटील यांनी पुढे म्हटलं, "त्यानंतर माझं-सुप्रियाताईंचं बोलणं झालं. मी चौकशी केली, तेव्हा त्यांनी अशी कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगितलं. संध्याकाळी मात्र बैठक आहे, ज्याला पाच वाजेपर्यंत मी पोहोचणार आहे. आता याचा विपर्यास किती करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं."
काल काय घडलं?
'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली.
'लोक माझा सांगाती' या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. नवा अध्यक्ष कोण होणार हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं असंही पवारांनी सांगितलं.
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं की, “रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो.”
ते म्हणाले, “गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.”
त्यांनी या समितीसाठी - प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के.शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसंच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन – ही नावं सुचवली आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते?
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्ष अविरत सुरू आहे. त्यापैकी 56 वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करतो आहे.
संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाअधिक लक्ष घालण्यावर भर असेल. याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे. युवक, युवती आणि विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील.
'साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष घडला तर तुम्हाला का नको?'
दरम्यान, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार घेण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ ते पक्षातून बाहेर पडणार असा होणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे, ते तो बदलणार नाहीत. भावनिक होऊ नका, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला आपलं समर्थन दिलं.
कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला होता. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्याच गोंधळात सगळ्यांच्या भाषणांनंतर अजित पवार बोलायला उभे राहिले.
सर्वांत शेवटी अजित पवार यांनी बोलायला सुरूवात केली. पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.
पार्टीचा जो अध्यक्ष होईल, तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल. साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, आपला सगळा परिवार असाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, शरद पवार यांनी परवाच म्हटलं होतं की, भाकरी फिरवायची असते. तुम्ही म्हणत आहात की, तुमच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी निर्णय घेतला. मी काकींशी बोललो, त्यांनीही म्हटलं की, ते निर्णय बदलणार नाहीत.
“साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शिकत जाईल. आपण त्याला साथ देऊ. आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना शिकवत असतो, घडवत असतो. तशा पद्धतीने गोष्टी घडू दे ना. तुम्ही कशाला काळजी करता.”
काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन अध्यक्ष तयार झाला, तर तुम्हाला का नको रे? असा सवाल अजित पवार यांनी केला.
काँग्रेसचं उदाहरण काय देता, काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयामुळेच आज देशात त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरचच अजित पवारांच्या वक्तव्याला विरोध केला.
कार्यकर्त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना बोलण्याचा आग्रह केला. मात्र अजित पवार यांनी माइक घेत सुप्रिया, तू बोलू नकोस, असं थेट सांगितलं. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीनं सांगतोय, असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना गप्प राहायला सांगितलं.
मात्र काही कार्यकर्त्यांनी आपल्याला दादांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं.
कार्यकर्ते शरद पवारांचं नाव घेऊन घोषणा घेतानाही दिसले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.
"तुम्ही पक्षाचे नेते आहात, तुम्हीच आमची कमिटी आहात. तुम्हाला असं बाजूला होता येणार नाही असं सांगत तुम्ही राजीनामा मागे घ्या", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.