गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (09:09 IST)

'संघर्ष न करता उद्धव ठाकरेंनी...' शरद पवारांच्या सुधारित आत्मकथेतील 5 स्फोटक किस्से

Sharad - uddhav
शरद पवार यांनी दिलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची बातमी परवा (2 मे) दिवसभरात ‘स्फोटक’ ठरली.
 
‘लोक माझे सांगाती...’ या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. पवारांच्या या सुधारित आत्मकथेत समाविष्ट केलेली नवी माहितीही तितकीच ‘स्फोटक’ आहे. पण पवारांच्या राजीनाम्याच्या बातमीनं त्याकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही.
 
पवारांनी आत्मकथेत सांगितलेले स्फोटक राजकीय किस्से आणि राजकीय व्यक्तींबद्दल बेधडक निरीक्षणं आम्ही इथे सांगणार आहोत.
 
शरद पवारांच्या आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध होणार म्हटल्यावर, सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती, ती म्हणजे ‘पहाटेच्या शपथविधी’बाबत शरद पवारांनी काय म्हटलंय, याची. या किश्श्यांची सुरुवात तिथूनच करुया.
 
1) ‘पहाटेच्या शपथविधी’बाबत शरद पवारांना कल्पना होती?
2019 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पूर्णपणे फिस्कटल्यानंतर नवीन समीकरणं जुळवण्याच्या प्रक्रियेत शरद पवारांची एन्ट्री झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तीन पक्षांना एकत्र करून ‘महाविकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली. मात्र, तोच एक राजकीय हादरा बसला, तो म्हणजे, ‘पहाटेच्या शपथविधी’चा.
 
याबद्दल शरद पवारांनी सुधारित आत्मकथेत म्हटलंय की, “राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं.”
 
“23 नोव्हेंबरच्या सकाळी 6.30 वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. ‘राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलंय. देवेंद्र फडणवीसांसोबत अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत’, अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता.
ajit panwar sharad panwar
ANI
“महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक-दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं. महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधलून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपनं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं.
 
“मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती.
 
‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही’ असं मी त्यांना नि:संदिग्ध शब्दात सांगितलं. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेण्यात आलंय, ते परततील, अशी ग्वाहीही उद्धव ठाकरेंना दिली.
 
यानंतर शरद पवार अजित पवारांना माघारी आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देतात. या प्रयत्नांमध्ये अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि शरद पवारांच्य पत्नी प्रतिभा पवार यांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
याबद्दल शरद पवार लहितात की, “अजितचा विषय आमच्यासाठी पक्षांतर्गत कळीच्या मुद्द्याप्रमाणे कौटुंबिकही होता. पक्षाच्या नेत्यांनी या काळात अजितबरोबर सातत्यानं भेटी घेतल्या. त्यानं बंड केलेलं असलं, तरीही पक्षातून बाहेर पडलेला नव्हता, ही जमेची बाजू होती. अजितचे बंधू श्रीनिवास पवार यांनाही त्याच्याशी संवाद ठेवायला सांगितला. त्यातून एक घडलं, अजितची बंडाबाबतची भूमिका निवळायला सुरुवात झाली.
 
“माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. प्रतिभा राजकीय घाडमोडींमध्ये कधीही पडत नाही, परंतु अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभाला भेटून, ‘जे झालं ते चुकीचं होतं आणि घडायला नको होतं’ अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केली. आमच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. त्याच्या या भूमिकेमुळे विषयावर पडदा पडला.”
 
2) पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त केल्या ‘या’ तीन खंत
शरद पवारांनी सुधारित आत्मकथेत उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाविषयी कौतुक केलंय. मात्र, हे करत असतानाही काही खंतही व्यक्त केल्यात.
 
उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना शरद पवारांनी म्हटलंय की, “मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोशाखात सहजपणाने वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होतं. कोरोनी महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद व आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केलं पाहिजे, असे या वर्गाला वाटलं.
 
“मंत्रालयातील प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. मंत्रालयातला वर्ग तीन आणि चारचा कर्मचारी सामान्य मुंबईकर आहे. या वर्गानं उद्धवना मनःपूर्वक साथ दिली.”
 
“या सर्व झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू,” असं म्हणत मग शरद पवारांनी उद्धव ठाकरेंबात तीन खंतही व्यक्त केल्यात.
 
पहिली खंत – उद्धव ठाकरे मंत्रालयात फार कमी उपस्थित राहायचे. त्यावरून विरोधकही उद्धव ठाकरेंना निशाणा बनवायचे. यावर शरद पवारांनी आत्मकथेत म्हटलंय की, “उद्भवना भेडसावत शारीरिक काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं,” असं शरद पवारांनी लिहिलंय.
 
दुसरी खंत – उद्धव ठाकरेंशी कसा संवाद व्हायचा, हे सांगता शरद पवारांनी म्हटलंय की, “बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे.”
 
तिसरी खंत – महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी उद्धव ठाकरेंबाबत एक खंत व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंनी संघर्ष केला नसल्याचं पवारांनी नोंदवलंय.
 
पवारांनी आत्मकथेत म्हटलंय की, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्त्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.”
 
3) ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत अंतर वाढलं’
अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणावाचे संबंध निर्माण होण्यास याचा काळात सुरुवात झाल्याचं आजवर अनेक राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. आता शरद पवारांनीही त्यांच्या आत्मकथेत याचा उल्लेख केला आहे.
 
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्रात आल्यानंतरच्या घडामोडींवर शरद पवारांनी म्हटलंय की, “आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसनं सूत्रं सोपवली. स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू. परंतु ते सर्वांना बरोबर घेऊन कारभार करतील का, आघाडीच्या राजकारणाचे पेच लक्षात घेत गाडा हाकतील का, याबाबत आमच्या मनात नक्कीच शंका होत्या.
supriya uddhav sharad sanjay
ANI
“दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कलानं चालणारे, अशीच पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीयांची ओळख होती. त्यांची काँग्रेस श्रेष्ठींसमवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करू शकेल, अशी आम्हाला साधार भीती होती. सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना बरोबर घेत कारभार हाकताहेत, असं दिसत होतं. आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या त्यांच्या सूत्राबद्दल आम्हाला प्रत्यवाय नव्हता. आमची हरकत असायचंही काही कारण नव्हतं आणि त्यात काही वावगंही नव्हतं.
 
“मात्र, थोड्याच दिवसात या भूमिकेत वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरलीही. राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला घटक आणि बदल घडताना दिसू लागला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला मित्रपक्ष आहे, या भूमिकेत थोडं अंतर पडायला सुरुवात झाली.”
 
2014 साली आघाडी तुटून काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यास आणि राष्ट्रवादीवर सिंचन घोटाळ्याचे आरोप होण्यास पृथ्वीराज चव्हाण कारणीभूत होते, असंही सांगण्याचा प्रयत्न शरद पवारांनी आत्मकथेतून केलाय.
 
पवारांनी म्हटलंय की, “2011-12 च्या महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातल्या नोंदीनुसार, 2001 ते 2010 या दशकात सिंचनावर 70 हजार कोटी खर्चा झाले आणि प्रत्यक्षात सिंचनक्षेत्रात केवळ 0.1 टक्केच वाढ झाली. या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे हा मुद्दा विरोधकांनी हात घेत राष्ट्रवादीविरोधात राळ उठवण्यास सुरू केली.
 
“राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपलं पहिलं लक्ष्य मानण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली. मंत्रिमंडळातल्या एकोप्याच्या वातावरणाला तडा जाऊन, दोन तट पडल्यासारखं झालं होतं. राष्ट्रवादीचे सारे मंत्री अस्वस्थ होतेच, परंतु पक्षसंघटनेतही चलबिचल होती. दुसरीकडे, प्रशासन गतिमान होण्याऐवजी थंडावलं होतं. निर्णयप्रक्रिया मंदावली होती. फायलींच्या अपेक्षित निपटाऱ्याला गती येत नव्हती. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना प्रशासनाची ही कूर्मगती उत्साहावर पाणी ओतणारी होती. लोकसभेच्या निवडणुकात काँग्रेसचंही पानिपत झालेलं होतंच, परंतु त्यामुळे त्यानंतर कारभारात काही बदल होतील, अशी अपेक्षा फलद्रूप झाली नाही.”
 
2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटण्यास पृथ्वीराज चव्हाणांना जबाबदार धरत शरद पवारांनी म्हटलंय की, “महाराष्ट्रात भाजपाचं तगडं आव्हान उभं होतं. आघाडी करूनच विधानसभा निवडणूक लढावी अशीच आमची इच्छा होती. पण काँग्रेस नेते विसंगत भूमिका घेत होते.
 
“लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असली तरी काँग्रेसपेक्षा जास्त जागा असल्यानं विधानसभेच्या जागावाटपात या ताकदीचा विचार करावा, असं आमच्या नेत्यांचं म्हणणं होतं. पण या प्रस्तावावर सामोपचाराच्या भाषेऐवजी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा सुरू केली.
 
“काँग्रेस नेते एवढंच बोलून थांबले नाहीत, तर उमेदवार जाहीर करण्याची तारीखच त्यांनी दिली. त्यात राष्ट्रवादीचं भाजपासोबत छुपं सामंजस्य असल्याचा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतर आणखी वाढवलं.”
 
4) राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ‘या’ मर्यादेचा देवेंद्र फडणवीसांना फायदा झाला
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून सत्तेत राहिल्याचा फटका 2014 ते 2019 या भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळात कसा बसला, याचं विवेचन शरद पवारांनी आत्मकथेत केलं.
 
शरद पवारांनी म्हटलंय की, “राज्यकारभारात आपली छाप पाडत असताना विरोधी बाकावर बसल्यावर त्या मर्यादेचं आकलन राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालं. मात्र, प्रशासकीय कामकाजात आमच्या पक्षाचे मंत्री वाकबगार झाले. सलग पंधरा वर्ष असल्यानं अनेकांना त्यांची कर्तबगारी सिद्ध करण्याची संधी लाभली.
 
हे असताना कमतरता एकाच बाबीची होती आणि ती म्हणजे, विरोधी बाकांवर बसण्याचा अनुभव अजिबात गाठीला नव्हता. सत्तेत असताना तुम्हाला अनेक आघाडयांवर टीकेला सामोरं जावं लागतं, परंतु विरोधात असताना तुमच अनेक आघाड्यांवर संघर्ष असतो. संघर्षाला सामोरं जाण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नव्या फळीला कधीच आली नव्हती.”
 
याचा फायदा देवेंद्र फडणवीसांना कसा झाला, हेही शरद पवारांनी नमूद केलंय.
 
पवार आत्मकथेत म्हणतात की, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असण्याच्या काळात विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली जबाबदारी चोख बजावली. त्या बाबतीत विधानसभेत कमतरता दिसली, परंतु क्षमता नव्हती, हे त्यामागचं कारण नव्हे. या पक्षाचा जन्मच मुळी सत्तेत झाल्यामुळे विरोधासाठी टोकाचं राजकारण करण्याची मानसिकता नव्हती, हे आहे.
 
“आमच्या पक्षात कोणत्याही विषयावर आंदोलनाची किंवा संघर्षाची भूमिका घेण्यासंबंधी चर्चा करताना अत्यंत आग्रही भूमिका घेण्याला मर्यादा पडतात. विरोध करायला हवा हे समजतं, पण त्यासाठी कोणत्याही संघर्षाची मनाची तयारी नसते. या मर्यादेचा लाभ देवेंद्र फडणवीस यांना झाला. त्यांचं काम अधिक सोपं झालं. त्यांना आणखी एक फायदा झाला तो माध्यमांकडून. माध्यमं फडणवीस यांना सातत्यानं सांभाळून घेत गेली.”
 
5) मोदींशी सुसंवाद ते संवाद तुटण्यापर्यंत
शरद पवारांच्या या सुधारित आत्मकथेतला मोठा भाग जसा महाविकास आघाडीच्या घडामोडींबाबत आहे, तसचा तो नरेंद्र मोदी सरकारबाबतही आहे.
 
नरेंद्र मोदींसोबतच्या शरद पवारांच्या संबंधांबाबत राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत राहिलीय. मात्र, आत्मकथेत शरद पवारांनी मोदींच्या अनेक निर्णयांची चिकित्स करत, नाराजी व्यक्त केलीय.
 
यात नोटाबंदी, जीएसटी, रेल्वे बजेट बंद, कृषी कायदे, लॉकडाऊन इत्यादी मुद्द्यांना हात घातलाय.
 
तत्पूर्वी, पवारांनी मोदींशी मधुर संबंध निर्माण कसे झाले, हे सांगितलंय.
 
पवार आत्मकथेत म्हणतात की, “2004 ते 2014 दरम्यान केंद्र सरकार आणि तत्कालीन गुजरात सरकार यांच्यात संवादकाची भूमिका मला बजावता आली. 2004 मध्ये केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार आलं. गुजरातमध्ये त्या वेळी भाजपचे नरेंद्र मोदी सत्तास्थानी मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी कमालीचा तिटकारा मोदींच्या मनात होता, तर काँग्रेस नेतेही मोदींपासून फटकून होते.
 
“मोदी घटनात्मक प्रमुख असूनही काँग्रेस नेतृत्वाबरोबर त्यांच्या ताणलेल्या संबंधांमुळे केंद्र आणि गुजरात सरकार यांच्यातला संवाद ठप्प होता. केंद्रातले काँग्रेसचे मंत्री मोदींसमवेत संपर्क ठेवण्यास अजिबात इच्छुक नसायचे. मोदी आणि काँग्रेसचे नेते यांच्यातल्या दुराव्याचा फटका गुजरातमधल्या जनते बसणं योग्य नाही, ही माझी प्रामाणिक धारणा होती. याविषयी मी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी बोललो आणि माझी मतं मांडली.
 
“प्रगल्भता आणि परिपक्वता अंगी असल्याकारणानं डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्याशी सहमती दर्शवत, 'ही जबाबदारी तुम्हीच पार पाडा,' असं सुचवलं. साहजिकच, केंद्र आणि गुजरात यांच्यातल्या संभाषणाचा मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी माझ्यावर आलं. स्वाभाविकपणे केंद्राकडे प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्या निवासस्थानी, अथवा कार्यालयात येत असत. त्यातून गुजरातच्या अनेक विषयांवरही तोडगे निघाले. मोदींच्या आणि माझ्यातल्या स्नेहल संबंधांविषयी जे बोललं जातं, त्याचं मूळ 10 वर्षं केंद्राचा प्रतिनिधी म्हणून मी पार पाडत असलेल्या जबाबदारीत आहे.”
 
हे सांगत असतानाच शरद पवारांनी मोदींनी संवाद तोडण्याकडे आणि पर्यायानं लोकशाहीत महत्त्वाची मानली गेलीली चर्चाच कशी बंद पाडली, याचीही उदाहरणं दिलीत. नोटाबंदी किंवा तत्सम निर्णय कुठल्याही चर्चेविना मंजूर केल्याची टीका पवारांनी आत्मकथेतून केलीय.
 
यात एक किस्सा संसदेच्या सेंट्रल हॉलबाबतच आहे. भाजपचे खासदारी मोदींनी कसे घाबरून राहत, हे पवारांनी सांगितलंय.
 
पवार म्हणतात, “मोदींच्या आधिपत्याखाली भाजपच्या सदस्यांनाही मोकळेपणानं मतं मांडायला, चर्चा करायला, संवाद करायला काहीतरी अडचण आहे, असं पदोपदी जाणवत राहतं.
 
“संसद भवनातला ‘सेंट्रल हॉल' ही खरंतर सर्वपक्षीय खासदारांची, पत्रकारांची निखळ मोकळ्या-ढाकळ्या गप्पा मारण्याची जागा. सभागृहात एकमेकांवर त्वेषानं तुटून पडणारे सदस्य इथे आल्यावर दिलखुलासपणे आपसात बोलतानाचं विलोभनीय दृश्य असतं. भारतीय लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रुजलेली पाहायची असतील, तर 'सेंट्रल हॉल' एवढी सुयोग्य जागा नाही.
 
“दुर्दैवानं लोकशाहीतला असा अनौपचारिक संवादही मोदी राजवटीत खुंटला. एका अनामिक दडपणाखाली भाजपाचे खासदार वावरताना दिसतात. 'सेंट्रल हॉल'मधून मोदी जाताना दिसले, की विरोधकांसमवेत गप्पा मारणारे खासदार गांगरून जातानाचं दृश्य नित्याचंच. 'सेंट्रल हॉलमध्ये वायफळ गप्पा भारत बसू नका, अशा स्पष्ट सूचना भाजपाच्या खासदारांना असल्याचा बोलवा आहे.
 
“आदान-प्रदानाची ही सशक्त आंतरक्रिया अशा पद्धतीनं बंद करणं, किंवा त्यावर बंधनं घालणारं वातावरण येणं, हे चित्र नक्कीच काळजी करणारं आहे. सभागृहात विरोधी पक्षाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही आता एक प्रकारे अंतर आलं आहे. संसद नावाच्या सुसंवादाच्या जागेत एक नवीनच प्रथा रुजली आहे. सरकारच्या आणि मोदींच्या विरोधी जरासाही कुणी सूर काढला, की त्या सदस्यावर, त्याच्या नेत्यांवर आणि पक्षावर तुटून पडायचं! हे दृश्य वारंवार.”
 
शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती...’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीतील हे किस्से आहेत.
Published By -Smita Joshi