उद्धव ठाकरेंनी त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असं त्यांनी जाहीर केलं होतं.
पण, त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर जमले. काही शिवसैनिक तर बॅरिकेड तोडून राणांच्या घरातही घुसल्याचं पाहायला मिळालं.
काल रात्रीपासून शिवसैनिक राणा यांच्या घरावर पहारा ठेवून होते. त्यात मुंबईचे आणि मुंबईबाहेरचे शिवसैनिकही होते. नऊ वाजता गर्दी वाढली आणि त्यावेळी शिवसैनिक बॅरिकेड तोडून राणांच्या घरात घुसले. पोलिसांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची संख्या कमी पडली. तासाभरापेक्षा जास्त काळ शिवसैनिक इमारतीच्या आवारात बसून आहेत आणि घोषणा देत आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना तिथून जायला सांगितलं तरीही ते तिथेच बसून आहेत.
शिवसैनिकांच्या या विरोधावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "एक आमदार आणि खासदारला घरी बंद करण्याचं कारण काय? त्यांना घरी येण्यापर्यंत ताकद कोणी दिली, गृहमंत्री त्यांच्या लोकांचा गैरवापर करत आहेत."
"पोलीस त्यांची कारवाई करतील. मात्र शिवसैनिकही अशा बदमाश लोकांना सामोरं जाण्यासाठी इथे आले आहेत" असं शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले आहेत.
आमदार रवी राणा याआधी म्हणाले, "उद्धवसाहेब हिंदुत्व विसरले आहेत आणि ते दुसऱ्याच दिशेनं जाऊन महाराष्ट्राचं वाटोळं करतायेत. महाराष्ट्राचं हे विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि उद्या 9 वाजता आम्ही तिथं जाणार आहोत."
मुंबई पोलिसांनी आम्हाला कलम 149 नुसार नोटीस दिलीय, अशी माहिती राणा दाम्पत्यानं दिली.
यावेळी रवी राणा म्हणाले, "आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाहीय. आमचा एकच उद्देश आहे, महाराष्ट्रातील संकटाच्या मुक्तीसाठी मोतीश्रीची वारी करणार आहोत. बजरंगबली, हनुमानाचं नाव घेताना विरोध होत असेल तर त्याला विरोध करावा लागेल."
"कायदा सुव्यवस्थेचं पालन करून मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू. कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाहीत. माझं आमच्या लोकांना आवाहन आहे की, मुंबईत येऊ नका. वातावरण बिघडवायचं नाहीय," असंही राणा म्हणाले.
"मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असं शिवसैनिक म्हणाले होते. पण शिवसैनिकांना मी मुंबईत आलो हे कळलंच नाही. आणि पाय नाही इथं जिवंत उभा आहे," असंही रवी राणा म्हणाले.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, "बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही, समाजासाठी लढाई केली."
"मुंबईत जन्म, विदर्भाची सून, शिवसैनिक माझं काहीही बिघडवू शकत नाही," असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.