लातूरकर दुष्काळाच्या लढ्यासाठी सरसावले ‘जलाग्रही लातूर’ चळवळ सुरु
सतत गंभीर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर एकवटले आहेत. त्यांनी ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोरदार पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे कोणाचाही राजकीय चेहरा नसताना सामान्य लातूरकरांनी दाखवलेला सहभाग यामध्ये अभूतपूर्व आहे. उजनीचे पाणी लातूरला मिळावे याची निवेदन लातूरकरांच्या वतीने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय जनशक्ती मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जलाग्रही लातूरच्या वतीने सामान्य लातूरकरांना एकत्रित करून उजनीच्या पाण्याकरिता आग्रही भूमिका घेण्यात येत असून, यामध्ये सर्वसामान्य लातूरकर सहभाग घेताना दिसून येत आहेत.
याच अनुषंगाने अष्टविनायक हॉल येथे पार पडलेल्या व्यापक बैठकीत आदोलानाची पुढील दिशा ठरविण्यात आली. केवळ घोषणा होईपर्यंत नव्हे तर ठोस कारवाई होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. यासोबत महानगरपालिकेच्या वतीने उजनीचे पाणी मिळविण्यासाठी ठराव घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने केंद्र शासन व राज्य शासना पर्यंत आपली मागणी नोंदवून सकारात्मक दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.