भाजपाध्यक्ष झाल्यावर फक्त ‘या’ दोघांच्या वाकून पाया पडलो होतो – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंचं चांगलं सहकार्य लाभलं. गोपीनाथ मुंडे हे माझे नेते होते.”
“भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते,” असं नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं, नितीन तू खाली वाकून मला नमस्कार कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी त्यांना तेव्हा सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली. तुम्ही आणि मी कुठेही गेलो तरी तुम्हीच माझे नेतेच आहात.”
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काल (18 मार्च) पार पडला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
“गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. त्यांच्या स्वागताकरता आणि सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो. त्यामुळे राजकारणात ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुणी होतं तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
Published By- Priya Dixit