पन्हाळगडाची ‘पुरातत्व’कडून तातडीने सर्वेक्षण सुरु
कोल्हापूर :ढासळणाऱया पन्हाळगडाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने तातडीने दखल घेतली आहे. तटबंदीला जेथे जेथे आधार देण्याची गरज आहे. त्याचा अंदाजित खर्च व त्याचे आराखडे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहाय्यक संजय चव्हाण यांनी एका वृत्तपत्रास ही माहिती दिली. भारतीय पुरातत्व विभागाकडे कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा व खिद्रापूर या ऐतिहासिक स्थळांची जबाबदारी आहे. जिह्यातील अन्य गड, किल्ले राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत.
जिह्यातील पन्हाळगड हा देशातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. सन ११०० ते १२०० या कालावधीत राजा भोज नरसिंह याच्या कारकीर्द पन्हाळगडाची बरीच बांधणी झाली. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासातील सर्वात कसोटीचा क्षण या किल्ल्यावर घडला आहे. सिद्धी जोहारच्या वेढय़ामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सलग तीन महिन्यांहून अधिक काळ वेढय़ातील मुक्काम याच किल्ल्यावर होता. त्यामुळे पन्हाळगडाला शिवरायांच्या इतिहासात खूप महत्त्वाचे असे स्थान आहे.
साधारणतः १ हजार वर्षापासूनचे अस्तित्व असलेल्या या किल्ल्याने भोज शीलाहार, यादव, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाही, महाराणी ताराराणी व त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा इतिहास अनुभवला आहे.