राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण-पालकमंत्री विखे-पाटील
सोलापूर लम्पी आजाराने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण केली होती. इतर राज्यातील परिस्थितीचा विचार करून वेळीच सावध होऊन राज्य शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून संपूर्ण लसीकरण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती महसूल, दुग्धविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितली.
पालकमंत्री नियुक्ती झालेले राधाकृष्ण विखे-पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात आले होते. सात रस्ता परिसरातील नियोजन भवन येथे त्यांनी विविध विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समितीची देखील बैठक पालकमंत्री विखे-पाटील यांनी घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लम्पी या जनावरांच्या आजाराबाबत माहिती दिली.
सुरुवातीच्या काळामध्ये राजस्थानमध्ये लम्पीबाधित जनावरांची संख्या मोठी होती. या राज्यामध्ये जवळपास 60 हजार जनावरे ही लम्पी आजाराने मृत्यू पडली. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने वेळीच याचे नियोजन केले. महाराष्ट्रामध्ये साधारण दीड हजार जनावरे ही लम्पी आजाराने दगावली आहेत. राज्यातील जनावरांचा मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत दिली आहे. याबरोबर जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
Edited by: Ratnadeep Ranshoor