शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:31 IST)

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांची सिडकोमध्ये बदली

Best Bus
निवडणूक आयोगाच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीपूर्वी सनदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण) बदलीचे सत्र मुंबईसह राज्यात व देशात सुरू झाले आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांची सिडकोमध्ये बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि अश्विनी भिडे या तीन सनदी अधिकाऱ्यांच्याही (महापालिकेत तीन वर्षे पूर्ण) लवकरच बदल्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेत नवीन आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कोण येणार, कोणत्या नेत्यांच्या, पार्टीच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लागणार, या पदासाठी कोण कोण इच्छुक आहेत, याबाबतच्या चर्चेला पालिकेत उधाण आले आहे.
 
दरम्यान, बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी अन्य कुणा सनदी अधिकाऱ्यांची नेमणुक झाली नसल्याने बेस्टचा हंगामी कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विजय सिंघल यांनी 5 जून 2023 रोजी लोकेश चंद्र यांच्याकडून बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

Edited By - Ratnadeep Ranshoor