1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव दाखल

भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून  लाखो आंबेडकरी बांधव आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  
 
कोरेगाव भिमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्यासैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ  भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह  देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.