आघाडीत घेण्यासाठी हा निव्वळ दिखावा : प्रकाश आंबेडकर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला हा आघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे.
त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र यावर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याबद्दलची चर्चा म्हणजे केवळ फार्स आहे,' अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.