बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 मार्च 2018 (10:33 IST)

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक करावी अन्यथा मोठे आंदोलन करून विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आझाद मैदानात एल्गार मोर्चामध्ये दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेतही आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम देत बजावले की, भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
 
फेसबुकच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देणार्‍या रावसाहेब पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली. पाटील यांचे भिडे यांच्याशी संबंध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आठ दिवसांत चौकशी करून, त्यामध्ये दोषी असलेल्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे सरकार लोकशाही मार्गाने आंदोलन करताना आम्हाला  थेट नक्षलवादी ठरवतात व आमच्यामागे मात्र पोलिसी कारवाईचा ससेमिरा लावतात, अशी टीका त्यांनी केली.
 
यावेळी भायखळा येथून आझाद मैदानात येणार्‍या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरी थेट आझाद मैदानात जमा झाले होते.