मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (14:37 IST)

खडसे-महाजनांमुळे राज्यभर गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान सुरू

girish mahajan khadse
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे नेते व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जळगाव – जिल्हा दूध संघाच्या २० जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला आज सकाळी आठ वाजेपासूनच सुरुवात झाली आहे. महाजन-खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यभरात गाजत असलेल्या या निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, या निवडणुकीत सध्या दीड लाख फुलींची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा ७ तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीला ४४१ जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले असून या केंद्रावर ४४ जण मतदान करणार आहेत.
 
जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला. दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळतेय. एकनाथराव खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचं चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor