रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (16:19 IST)

पीडितेला न्याय द्या, आरोपीलाही जाळा, संतप्त नागरिकांची मागणी

हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून पेटवलेल्या पीडित प्राध्यापिकेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये  सहभागी झाले आहेत.
 
पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. ज्याप्रमाणे पीडितेला जाळण्यात आलं, तसंच आरोपीलाही जाळा, अशी मागणी काही संतप्त नागरिकांनी केली. नराधम आरोपीचा एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी प्रामुख्याने मोर्चात करण्यात आली. सर्वपक्षीयांनी ‘हिंगणघाट बंद’ची हाक दिल्यानंतर चौकाचौकातील दुकानं बंद करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभाग नोंदवला.