सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:29 IST)

असे केले मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनवर भाष्य

दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे. या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारचं काम विकास करणं आहे. बरोबर आहे… अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. कामे सुरू आहेत हेही खरं आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे… जरूर दिली आहे. मला नेहमी असं वाटतं की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोबीनं गरजेचं आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा… किंवा कमी दरानं कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या.. पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
 
‘बुलेट ट्रेनचं काय?,’ असा उलट प्रश्न राऊत यांनी केला. त्यावर ठाकरे म्हणाले, “बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं. याच्यावरती सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते,” असं उत्तर ठाकरे यांनी दिली. राऊत यांनी ‘पण ते तर प्रधानमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे,’ असं ठाकरे यांना सांगितलं. त्यावर “असेल. बरोबर आहे, पण हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते. स्वप्न नसतं,” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.